ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.
ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून जाहिरात आणि ब्रँडिंगच्या क्षेत्रात जोग हे कार्यरत आहेत. ब्रँडिंगमधील आपला संपूर्ण अनुभव त्यांनी या पुस्तकातून समोर आणला आहे. ब्रँडिगबाबत इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकं असली तर मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक मार्केटिंग, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिग आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना तर उपयुक्त आहेच. शिवाय या क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तींसाठीही ते महत्त्वाचे आहे.
पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'
या पुस्तकात ब्रँड पोझिशनिंग, ब्रँड इसेन्स, ब्रँडचे रंगरुप, आयडेंटिटी, ब्रँड पर्सनॅलिटी, ब्रँड आर्किटेक्चर, ब्रँड बिल्डिंग, ब्रँड व्हॅ्ल्यू, ब्रँडिंगची गरज कोणाला अशा प्रकरणांमधून अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत योग्य उदाहरणांसह ब्रँडिंगची अभिजित जोग यांनी ओळख करुन दिली आहे. यशस्वी ब्रँडिंगचं इंगित जोग यांनी सांगितलं आहे.
ब्रँडिंग आणि मराठी उद्योजक याबाबत जोग यांनी पुस्तकात म्हटलं आहे की, मराठी उद्योजक हा तंत्रज्ञान, आधुनिक मशिनरी यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला सहसा मागेपुढे बघत नाही; पण मार्केटिंग, ब्रँडिंग, ब्रँड बिल्डिंग यांसारख्या 'इंटँजिबल' गोष्टींमध्ये वेळ, शक्ती व पैसा गुंतवायला मात्र सहजासहजी तयार होत नाही. आपण मराठी माणसं रोखठोक. 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' हा आपला बाणा. त्यामुळे आज समोर न दिसणाऱ्या, कधीतरी भविष्यात जिचा उपयोग होईल अशा ब्रँडसारख्या संकल्पनेतली गुंतवणूक ही मराठी मनाला पटतच नाही. या सवयीमुळे आजच्या स्पर्धात्मक जगात मराठी माणसाच्या, मराठी उद्योगांच्या वाढीला मर्यादा पडतात.
गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, एटी अँड टी, फेसबुक, व्हिसा, ऍमेझॉन, व्हेरिझॉन, मॅक्डोनाल्ड्स आणि आयबीएम हे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेले पहिले १० ब्रँड्स आहेत. हे सर्व ब्रँड्स अमेरिकेत सुरु झालेले आहेत. म्हणूनच आजही अमेरिका हे जगातलं सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्र आहे.
अमेरिका-युरोपच काय, आशियातील जपानचे सोनी, शार्प, होंडा, टोयोटा, सुझुकी यांसारखे जपानी ब्रँड्स आज जगभर पसरले आहेत. भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या कोरियासारख्या देशाचे सॅमसंग, ह्युंदाई ब्रँड्स खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. जोपर्यंत भारत असे ब्रँड्स बनवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता म्हणून आपला उदय झाला असे म्हणता येणार नाही, असे जोग यांनी म्हटले आहे.
पुस्तकाचे नाव- ब्रँडनामा
लेखक- अभिजित जोग
प्रकाशक- रसिक आन्तरभारती
- दिग्विजय जिरगे
व्वा...
उत्तर द्याहटवापुस्तकाची नेमकी ओळख करून दिलीत. त्यामुळे पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. कुठे मिळेल.
खूप माहिती देणारा विश्लेषण आणि पुस्तकाही माहिती झाली
उत्तर द्याहटवा