हा खेळ आकड्यांचा...

काही गोष्टी आयुष्यात काही क्षणांसाठी येऊन जातात. पण त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. लेखाची सुरुवात जरी अशी असली तरी पुढचा सगळा भाग अनैतिक गोष्टींचा आहे. अनैतिक (सरधोपट अर्थ घेऊ नका) म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही मित्रमंडळींनी काय-काय केलं होतं, त्या आठवणीपैकी एक अशी आठवण जी विसरणं शक्यच नाही..या आठवणींना उजाळा मिळाला तो रतन खत्री नावाच्या एका कुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाच्या बातमीमुळं... आता हा खत्री कशासाठी प्रसिद्ध होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही... खत्रीनं जग सोडलं.. पण त्यापूर्वी म्हणजे सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी १५ दिवस तोही आमच्या आयुष्यात येऊन गेला.. त्याने आमच्याकडून आकडेमोड करुन घेतली. त्याचं गणित आम्हाला काही रुचलं नाही किंवा जमलं नाही असंही म्हणता येईल.. पण त्यामुळं सांख्यिकीतज्ज्ञ होता-होता थोडक्यात वाचलो.

साधारणतः २०००- २००१ सालची ही गोष्ट आहे.. आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आम्ही काही मित्रांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता (वडिलांचं स्वप्न होतं. पोरगं घरात वाद घालताना वकिली पाँईंटने वाद घालतो..त्याला वकिली व्यवसायात यश मिळेल असं वाटलं असेल..अस्मादिक वगळता सर्व मित्र वकील झाले, हे वेगळं सांगण्याची गरज नाही). त्यावेळी वेतन आयोग वगैरे असले प्रकार प्रचलित नव्हते. त्यामुळे आमच्या मित्रांपैकी अनेकांचे वडील जरी सरकारी नोकरी करत असले तरी परिस्थिती संपन्न म्हणतात तशी नव्हती.. वडिलांसह त्यांची मुलेही म्हणजे आम्हीही सायकलच वापरत असू (सध्या असले प्रकार पाहायला मिळत नाही). पदवीपर्यंतचे शिक्षण सायकलवरच पूर्ण केलं.. मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो, ते ८ ते १० किमी लांब होतं. तीन वर्षे सायकलवारी केली. त्यावेळी एम ८० आणि लुना मोठ्याप्रमाणात असत. नंतर स्प्लेंडर, बॉक्सरचा जमाना आला..

तर वडील नुकतेच निवृत्त झाले होते. मुलाला आता कायद्याचं ज्ञान घेण्यासाठी खूप लांब जावं लागतं म्हणून निवृत्तीनंतर आलेल्या पैशातून त्यांनी स्पेलंडर घेतली (जी आजही मी पुण्यात वापरतो). पण गोची येथूनच पुढे सुरु झाली. त्यावेळी पेट्रोल जरी २०-२५ रुपयांच्या घरात असलं तरी ते झेपण्यासारखं नव्हतं. पॉकेटमनी नावाचा असा काही प्रकार नव्हता. त्यावेळी वडिलांना वाटलं तर ते कधीतरी १५ ते २० रुपये देत. गाडी घेऊन दिल्यानंतर तो भत्ता ५० ते ६० रुपयांच्या घरात गेला. तो कधी मिळेल याची खात्री ही नव्हती. हे काही परवडण्यासारखं नव्हतं. कारण उत्पन्नाचं काही साधनही नव्हतं.

बाईक चालवण्यासाठी त्यावेळी 'आत्मनिर्भर'ता नव्हती. कधी मित्रांकडून उधार-उसनवारी तर कधी बळजबरीने त्याला पेट्रोल भरायला लावण्याचा शिरस्ता पडला होता. पण असं किती दिवस करणार असा मला आणि माझ्या काही मित्रांना प्रश्न पडला. त्यावेळी जागोजागी टपऱ्या असत. तिथं खाण्या-पिण्यासाठी काही मिळत नसत. पण काही आकडे कागदावर लिहून ठेवलेले असत. त्यावेळी आमच्या काही सायन्स पदवीधर आणि इंजिनिअर मित्रांमुळे हा मटका नावाचा प्रकार आम्हाला माहीत होता.

कल्याण-मुंबई नावाच्या या मटक्यात आपण लावलेला नंबर आल्यास भरपूर पैसे मिळतात याची माहिती होती. आमचे काही मित्र यात चांगली कमाईही करत असत. आमचा ग्रूप जमा झाल्यानंतर ते सर्वजण याच विषयावर बोलत असत आणि आता संध्याकाळी कोणता आकडा येणार आहे. मग कशावर किती पैसे लावायचे. याच्या रसभरीत चर्चा रंगायच्या. मी मित्रांच्या अनेक ग्रूपबरोबर फिरत असत. विशेष म्हणजे प्रत्येक ग्रूपमध्ये कोणी ना कोणी तज्ज्ञ असत.

'सिंगल', 'पाना', 'जॉईंट', 'संगम', 'लंगडा' या शब्दांची त्याचवेळी तोंडओळख झाली. पण शालेय जीवनापासून गणितात गती नसल्याने या रटाळ आकडेमोडीत मी कधी पडत नसत. हा काही आपला प्रांत नाही असं म्हणत, त्यापासून दूर राहत. माझे अनेक मित्र स्थानिक वृत्तपत्रात आलेले टेबल घेऊन त्याचा तासन्तास अभ्यास करत बसलेले असत. या खेळाची सुरुवात १ रुपयांपासून होते आणि आकडा अचूक आल्यास भरपूर पैसे मिळतात याची माहिती होती. हा सर्व खेळ केवळ एका चिठ्ठीवर चालतो. एखाद्या मित्राबरोबर त्याचा आकडा लावण्यास गेल्यानंतरही त्या टपरीपासून आम्ही इतर मित्र लांब राहत. त्यामुळे या भानगडीत पडण्याचा प्रश्नच नव्हता.

परंतु, गरज माणसाला काहीही करायला लावते, याचा प्रत्यय मला व माझ्या काही मित्रांना आला. त्यावेळी स्प्लेंडर जरी चालवत असलो तरी खिशात दमडी नसायची. यावर तोडगा म्हणून आम्ही काही मित्रांनी मटक्यात नशीब आजमवण्याचं ठरवलं. मटका खेळायचं ठरवलं असलं तरी आमच्या मनात प्रचंड भीती होती. विशेष म्हणजे आयुष्यातील १० ते १५ दिवस जो मटका आम्ही खेळला तो अंदाजे २० ते २५ रुपयांच्या घरातच खेळला. याउपर आम्ही गेलोच नाही हे छातीठोकपणे मी सांगू शकतो. कारण आमच्याकडे तेवढेच पैसे होते आणि त्यातही आम्ही 'प्रचंड' नुकसानीत गेलो. त्यामुळे हा आपला प्रांत नाही हे तेव्हाच लक्षात आलं.

एका दिवशी जास्तीत जास्त ३ ते ४ रुपयांचाच मटका लावलेला मला आठवतो. हा आकडा लावतानाही आम्ही मित्रमंडळी अजब तर्क लावत असू. जो क्रमांक आम्हाला त्या दिवशी वारंवार दिसत त्यावर आम्ही पैसे लावत असत. म्हणजे दोघा-तिघांना जो आकडा जास्त दिसत त्यावर १-१ रुपये सिंगल लावत असू. मला एकदाच काहीतरी एक रुपयाचे ९ रुपये मिळाल्याचे अंधुकसं आठवतं. त्यावेळी इतका आनंद झाला होता की, विचारायची सोय नाही. पण तो हर्षवायू एकच दिवस टिकला. नंतरच्या दिवसांत कधीच माझा आकडा लागला नाही.

आकडा लावण्यासाठी आम्ही एक टपरी निवडली होती. त्या टपरीवर आम्ही थेट जात नसत. पहिल्यांदा आम्ही त्या टपरीसमोरुन जात. कोणी ओळखीचा नाही याची खात्री करत. मगच त्याच टपरीत आकडा लावायला जात. कोणी ओळखीचं आम्हाला त्या ठिकाणी पाहू नये, अशीच मनोमन प्रार्थना करत आम्ही टपरी गाठत असत. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पटकन नंबर सांगून ती चिठ्ठी घेऊन तिथून पळ काढत असत. आम्ही नवखे आहोत, हे त्या टपरीवाल्यालाही माहीत होतं. पण त्याने नेहमीच आम्हाला 'सहकार्य' केले (आजही तो टपरीवाला त्या जागेवर मला दिसतो).

मटका लावून आल्यानंतर जवळच राहत असलेल्या मित्राच्या घरी जाऊन त्यावर आम्ही चर्चा करत असत. पण थोड्याच दिवसांत आम्हाला लक्षात आलं की हे क्षेत्र आपल्याला काही मानवणारं नाही. त्यामुळे सुरुवातीला जो उत्साह होता. तो नंतर टिकला नाही. जवळचे पैसे ही संपत असल्यामुळे शेवटी कोणतीही चर्चा न करता आमचा विषय तिथंच थांबला.

परवा पेपर वाचताना हे सर्व आठवलं. पहिल्याच पानावर रतन खत्रीच्या निधनाची बातमी होती. हे वाचून त्याच्या चाहत्यांना किती दुःख झालं असेल. मला तर तो जिवंत होता, तेच माहीत नव्हतं. पण खत्रीच्या निधनाच्या बातमीमुळे आमच्या आयुष्यातील ते १५ दिवस सर्रकन निघून गेले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'