भारतीय संगीतातील वादळ

भारतीय संगीतातील वादळ



अल्लारखाँ रहमान अर्थातच ए आर रहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील दैवी देणगी लाभलेला संगीतकार. संगीतप्रेमी त्याला 'पूर्वेकडचा मोझार्ट' म्हणतात. 'रोजा' चित्रपटापासून सुरू झालेला रहमानचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरूद्ध बंड करणारी कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरील हुकूमत लाभलेल्या रहमानचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास अत्यंत नाट्यमय असा आहे. आपल्या जादुई संगीतामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रहमानबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. परंतु, रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. किंबहुना ती माहिती बाहेर जाऊच नये असाच प्रयत्न केला गेला. 'ए आर रहमान- दी म्युझिकल स्ट्रॉम' या मूळ इंग्रजी व 'ए आर रहमान- संगीतातील वादळ' या मराठी अनुवादित पुस्तकातून एक वाद्य वाजवणारा दिलीप ते ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ए आर रहमान हा प्रवास उलगडण्यात आला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका कामिनी मथाई या आहेत. तर मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. रहमान व त्याच्याबरोबर काम केलेल्या गायक, गीतकार, संगीतकार मित्रांबरोबरील चर्चेतून हे पुस्तक चितारण्यात आलंय.

रहमान जाणीवपूर्वक आपल्या भूतकाळाबद्दल अव्यक्त राहिला. त्याच्या आयुष्यात ईश्वर आणि आपली आई यांना अनन्यसाधारण महत्व आहे. वयाच्या नवव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावलेल्या रहमानला शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडून वादक म्हणून काम करावं लागलं. त्याचा हाच प्रवास लेखिकेने मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं बालपण, धर्मांतर, वादक म्हणून केलेलं काम आणि वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांची माहिती यात दिलीय. रहमानचं धर्मांतरापूर्वीचं नाव दिलीप कुमार. त्याचे वडील आर के शेखर हे तामिळ चित्रपटसृष्टीतील संगीत दिग्दर्शक. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे घरची जबाबदारी लहानग्या दिलीप व आई कस्तुरीवर पडली. अवहेलना, न्यूनगंड यांनी त्याचं बालपण कोळपून गेलं होतं. याचदरम्यान आईवर पडलेला मुस्लिम धर्माचा प्रभाव, त्यामुळं केलेलं धर्मांतर. हा नाजूक क्षण लेखिकेनं चांगल्या पद्धतीने मांडलाय. ज्यावेळी मणिरत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटासाठी रहमान संगीत देत होता. त्यावेळी मणिरत्नम यांनाही त्याच्या धर्मांतराबाबत माहीत नव्हतं. त्यांनी श्रेयनामावलीत दिलीप कुमार असंच नाव लिहिलं होतं. मग मणिरत्नमला विनंती करून श्रेयनामावलीत हे नाव बदलण्यात आलं. तेव्हाच दिलीप कुमारचा ए आर रहमान झाल्याचं जगासमोर आलं.


वडिलांच्या मृत्यूपश्चात रहमान उपजिविकेसाठी अनेक संगीतकारांकडे वादक म्हणून काम करत. याचदरम्यान त्याला जाहिरातीसाठी जिंगल्स तयार करण्याचं काम मिळू लागले. जिंगल्समध्ये रहमानने चांगलंच नाव कमावलं. यातूनच त्याला चित्रपटाचे काम मिळालं. रहमानने इलय्या राजा यांच्याकडे वादक म्हणूनही काम केलं. इलय्या राजा आणि रहमानच्या छुप्या स्पर्धेवरही या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.

रहमानने संगीतरचनेतील रूढ पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत अस्तित्वात आणली. त्याची ही पद्धत चाहत्यांना कमालीची आवडली. पण या क्षेत्रात असणाऱ्या अनेक जुन्या जाणत्यांना ती आवडली नाही. त्यामुळं अनेकांनी आपली नाराजीही लेखिकेशी बोलताना व्यक्त केली आहे. एस पी बालसुब्रमण्यमसारख्या दक्षिणेकडील काही प्रसिद्ध गीतकार व गायकांनी विरोधही केलाय. रहमानची कामाची पद्धतही अत्यंत विचित्र आहे. तो रात्रभर काम करतो आणि दिवसा झोपतो. यामागचे कारणही लेखिकेने पुस्तकात मांडलंय. चेन्नईतील रहमानच्या स्टुडिओमध्ये दिग्गज दिग्दर्शक, गीतकार, निर्मात्यांना रहमानची भेट घेण्यासाठी दिवस-दिवस वाट पाहावी लागते. लेखिकेलाही रहमानच्या मुलाखतीसाठी हा अनुभव आला. रहमानला करारबदद्ध करायचं असेल तर संयमाची मोठी गरज भासते. दिलेल्या वेळेप्रमाणं त्याच्याकडून काम होतच नाही, अशी तक्रार अनेक निर्मात्यांनी लेखिकेकडे केली. परंतु, नवोदितांसाठी त्याची दालने मात्र कायम खुली असतात. त्याने अनेक अज्ञात कलाकारांना शोधून त्यांना संधी दिली. त्याला सातत्याने गायक, वादकांकडून नाविन्याची अपेक्षा असते.

रहमानवर धर्माचा खूप प्रभाव असल्याचे लेखिकेनं म्हटलंय. त्याच्या प्रत्येक वाद्यावर ७८६ हा क्रमांक लिहिलेला आहे. रहमानच्या घरातून दर शुक्रवारी गरिबांना बिर्याणी पाठवली जाते. गरजू व गरिबांना तो मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करतो. या पुस्तकाच्या माध्यमातून रहमानच्या दातृत्वाची माहिती जगासमोर आली. श्रेयनामावलीत वादकांच्या नावाचाही समावेश करून त्यानं चांगला पायंडा पाडला. रहमानची कामाची पद्धत या पुस्तकामुळं समजते. ईश्वरानेच आपल्याला घडवलंय अशी त्याची धारणा आहे. त्याच्यामुळंच आपल्याला ऑस्कर मिळाल्याचे तो म्हणतो. गीतांच्या निर्मितीमागची प्रक्रिया उलगडण्यासही या पुस्तकामुळे मदत होते. पुस्तकाच्या सुरूवातीला रहमान व त्याच्या कुटुंबीयांची छायाचित्रातून ओळख करून देण्यात आली आहे. ग्लॅमर मागचा वेगळा रहमान जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं असंच आहे.

- दिग्विजय जिरगे 
divijay.jirage@gmail.com


ए आर रहमान- संगीतातील एक वादळ
मूळ लेखिका : कामिनी मथाई
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पाने : ३२४ ; किंमत : २९५ रुपये


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'