'अमूल' मॅन- The Amul Man

'अमूल' मॅन





भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. 
एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली. आणंद या गुजरातमधील एका छोट्याशा खेडेगावाला त्यांनी जागतिक पातळीवर नेलं. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी त्यांना अनेकांशी संघर्ष करावा लागला. यात सनदी अधिकाऱ्यांसह राज्यकर्त्यांनाही त्यांना तोंड द्यावं लागलं. अनेकवेळा निराशेचे क्षण आले. त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्या अटींवरच काम केलं पण ते शेतकरी हितासाठी.

डॉ. कुरियन मुळचे केरळचे. त्यांना सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याने परदेशात उच्च शिक्षणासाठी जावं लागलं. सरकारने दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीसाठी त्यांना परदेशात पाठवलं. इच्छा नसताना कुरियन यांना हा विषय घ्यावा लागला. 'गाय कशी दिसते हेही माहीत नसलेल्या, स्टील प्लांटमध्ये काम करणाऱ्या माणसाला दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकी शिकण्याकरता परदेशी पाठवलं,' असं कुरियन म्हणतात. भारतात आल्यानंतर सरकारच्या अटीमुळे त्यांना नाईलाजाने आणंदला जावं लागलं. अनिच्छेने सुरू झालेला हा प्रवास तब्बल ५० वर्षे एका ध्येयासाठी चालला. या प्रवासात सुरूवातीला त्यांना सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, त्रिभुवनदास पटेल यांचं मार्गदर्शन मिळालं. परदेशात शिकून आलेल्या कुरियन यांना आणंदमध्ये आल्यानंतर एका पडक्या खोलीत राहावं लागलं.

आणंदमधील शेतकऱ्यांना सहकाराच्या माध्यमातून त्यांनी दुग्धोत्पादनात आणलं. फक्त शेतकरीच नव्हे तर महिलांनाही आर्थिकदृष्टया सबळ केलं. खासगी कंपन्यांना टक्कर देत सहकार क्षेत्राचा एक ब्रँड बनवला. हे फक्त त्यांनी आणंद पुरतंच न करता संपूर्ण देशभरात केलं. त्यांच्यामुळे देशात धवलक्रांती झाली. देशभरात दुधाचे पाट वाहिले. पूर्वी ज्यासाठी आपण दुसऱ्यांवर निर्भर होतो. आज त्याची निर्यात केली जाते. 'अमूल'च्या प्रेरणेतून निर्माण झालेली दुग्धविकास चळवळ ही सर्वांत मोठी रोजगार योजना असल्याचे ते म्हणत.

कुरियन यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी नोकरशाही व राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणावरही टीका केली आहे. त्यांच्या परखड स्वभावाचा कामावर कधीच परिणाम झाला नाही. सरकारे बदलली पण कुणीच त्यांना त्यांच्या जागेवरून हटवलं नाही. प्रत्येकवेळी त्यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्षपद, गुजरात कृषि विद्यापीठाचे कुलगुरूपद यासह देशातील विविध सरकारी व सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं. अनेक सहकारी संस्थांना तोट्यातून बाहेर काढलं. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही त्यांना यासाठी बोलावणं आलं. श्रीलंका, पाकिस्तान सरकारनेही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. पद्मभूषण, पद्मविभूषण, मॅगसेसे पुरस्कार यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.

सेवाव्रती जीवन जगलेल्या कुरियन यांनी 'अमूल'च्या ब्रँडिंग, मार्केटिंगवर भर दिला. 'अटर्ली बटर्ली डिलिशस अमूल' असो किंवा 'अमूल दूध पिता है इंडिया' या पंचलाइन प्रत्येकाच्या तोंडी आहेत. 'अमूल'ची उत्पादने आजही आपला दर्जा राखून आहेत. कुरियन यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे 'अमूल'चे बाजारात वर्चस्व आहे. वेळोवेळी राजकीय नेतृत्वाशी करावा लागलेला संघर्ष, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीचाही या पुस्तकात उल्लेख आहे. कुरियन यांच्या या 'अमूल्य' कार्यामुळेच 'अमूल'चे स्थान आजही अढळ आहे.

- दिग्विजय जिरगे
divijay.jirage@gmail.com

माझंही एक स्वप्न होतं...
वर्गीस कुरियन
इंग्रजी शब्दांकन : गौरी साळवी
अनुवाद : सुजाता देशमुख
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पाने : २१०; किंमत : २०० रुपये

#amul #verghesekurien #digvijayjirage #माझंही एक स्वप्न होतं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'