महापालिका रणांगण: नवे कारभारी निवडताना पुणेकरांचाच लागणार कस!

पुण्याची जनता 'सवाई' आहे, असे म्हटले जाते. परंतु, त्यांनीच निवडून दिलेले सत्ताधारी त्यांच्यापेक्षाही 'सवाई' निघालेत. गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली सामान्यांना झुलवत ठेऊन अनोखा 'पुणे पॅटर्न' राबवून जनतेलाच वेठीस धरणा-या राजकीय पक्षांनी आता 16 फेब्रुवारीसाठी नव्याने रणशिंग फुंकलंय. विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष नसलेली पुणे महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महानगरपालिका असेल, कारण गेल्या पाच वर्षात येथे जवळपास प्रत्येक पक्षाने सत्तेची ऊब घेतलीये.
पुणे शहर खरचं देशातील एक 'अनोखं' शहर ठरू पाहातयं. शहरातील राजकीय परिस्थिती पाहिल्यास याचं 'अनोखं'पण आपल्या लक्षात येईल. खासदार भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात त्यामुळे संसदेत शहराचे नेतृत्वच नाही तर राष्ट्रवादीच्या हातात महानगरपालिका असूनही अंतर्गत गटबाजीमुळे विकासाला लागलेले ग्रहण यामुळे खरा पेचात पडला आहे तो 'पुणेकर'. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही शहराच्या प्रगतीला खोच मिळालाय.
राष्ट्रवादीला पुण्यात कॉंग्रेसशी आघाडी करायचीच नव्हतीच. त्यांनी निवडणूक जाहीर होताच प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र जाहीरनाम्यामुळे ते स्पष्टच झाले होते. कारण कोणत्याही पक्षाला काही तासांत स्वतंत्र जाहीरनामा घोषित करता येणे शक्य नाही, परंतु ही किमया राष्ट्रवादीने साध्य केली. कदाचित 'जादुई' नेतृत्वामुळे हे शक्य झाले असेल. आपली ताकद माहीत असलेल्या राष्ट्रवादीने वेळ येताच कॉंग्रेसला कोलदांडा दिला.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर नजर टाकल्यास लक्षात येतं हा जाहीरनामा म्हणजे मागील पानावरून पुढे असाच प्रकार आहे. 2007 च्या निवडणुकीतील आश्वसानांचीच 'री' पुन्हा ओढल्याचे दिसून येते. जाहीरनामा घोषित करताना मागील जाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली, याचे उत्तर पक्षाने दिलेले नाही. आधीच्या उड्डाणपुलाच्या कामाचे काय झाले माहीत नाही, पण आचारसंहिता लागू होताच नवीन उड्डाणपुलाच्या भूमीपूजनाची घाई केली. हे म्हणजे जनतेला 'बनवण्याचा' प्रकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही घाई चांगलीच नडली. त्यासाठी त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटिशीला उत्तर द्यावे लागले.
मागच्या निवडणुकीत 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे काय झाले हे राष्ट्रवादीलाच माहीत कारण तेव्हापासून पुण्यातील पाण्याचे गणित जे बिघडले ते अद्याप ताळयावर आलेले नाही. बीडीपी आरक्षणाबाबत पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि इतर नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. मेट्रो रेल्वेबाबतही तीच अवस्था. जमिनीवरून की जमिनीखालून हा यक्ष प्रश्न आहेच पण राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानादेखील हा प्रश्न इतके वर्ष रेंगाळतोच कसा? याचेच कोडे पडते. फसलेला बीआरटीचा प्रयोग पुन्हा यावेळस अंमलात आणण्याची योजना आखण्यात आली आहे. एकंदर जाहीरनाम्याकडे पाहिल्यास जनतेच्या तोंडी पाने पुसण्याच प्रकार राष्ट्रवादीकडून पुन्हा पुन्हा होतोय, असे जाणवते.
शहरात सध्या कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट झालीये. भ्रष्टाचारामुळे नेतृत्व गजाआड असल्याने कोणत्या तोंडाने मतदारांसमोर मते मागायची हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. आगामी निवडणुकीपर्यंत कलमाडी तुरूंगातून बाहेर येतील, असा विश्वास कलमाडी समर्थकांना होता, पण सद्यस्थिती तशी दिसत नाहीये. कलमाडी यांच्यामुळे अजित पवार यांना टक्कर देणारा खमक्या नेता कॉंग्रेसकडे होता. राज्य नेतृत्वाने अजित पवारांविरूद्ध लढण्यासाठी इथे हर्षवर्धन पाटील आणि पतंगराव कदम यांना नेमले. पण यांच्यासमोरही अनेक प्रश्न आहेत.
कारण शहरात कलमाडी समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत त्यामुळे नेतृत्वाची धुरा कोणाकडे द्यावी हा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. महायुतीमुळे आणि खडकवासला पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सत्तेची स्वप्ने पाहाणा-या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना अजून जागेचेच गणित सोडवता आलेले नाही. माघार कोण घेणार हा इथे प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. भाजप-सेना मध्ये असलेला पूर्वीपासूनचा जागेसाठीचा वाद आता आरपीआयमुळे आणखीनच क्लिष्ट झालाय.
निवडणुका तोंडावर आल्या आहेत पण यांच्यात अजून जागेचाच घोळ सुरू आहे. युती घोषित करण्यास जेवढा उशीर होईल, तेवढा जास्त फायदा अन्य पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नीलम गो-हे, भाजपचे विकास मठकरी आणि आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्यात नुसत्याच बैठका होत आहेत.
उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनाला फाटा देऊन साध्या पद्धतीने त्यांची मुलाखत घेणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत लोकांच्या मनात कमालीचे औत्सुक्य आहे. पण आपल्या सूज्ञपणासाठी जगभर प्रसिद्ध असलेला मध्यमवर्गीय पुणेकर मतपेटीतून त्याला प्रत्युत्तर देईल, अशी शक्यता कमीच वाटते. प्राप्त परिस्थितीत मनसे महापालिकेत क्रांतीकारी विजय मिळवण्यापेक्षा इतरांची किती मते खेचेल, यावरच पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा