हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होऊन आज 34 वर्षे झाली. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी मी शाळेत होतो. राजकारण आताही कळत नाही आणि तेव्हाही कळत नव्हतं. पण राजीव गांधींबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. त्यामुळं त्यांची हत्या झाली कळल्यावर खूप हळहळ वाटली होती.
नेमकं आत्ताच "राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?" हे फराझ अहमद लिखित आणि अवधूत डोंगरे अनुवादित मराठी पुस्तक वाचण्यात आलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर एक संशयास्पद आणि धक्कादायक दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
राजीव गांधीबद्दल असं काही होऊ शकतं असा विचारही सर्वसामान्यांच्या मनात येणार नाही. परंतु, पुस्तकात जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावरून आपल्याही मनात शंका यायला सुरूवात होते.
लेखकानं अधिकृत तपासण्या आणि अहवालांमध्ये नोंदवलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हत्येमागे केवळ एलटीटीईचाच हात नव्हता, तर भारतातील काही अंतर्गत शक्तींचाही सहभाग असू शकतो, असा दावा केला आहे.
पुस्तकात लेखकाने विविध तपशील, पुरावे आणि घटनांची साखळी उलगडत, या हत्येच्या मागील संभाव्य राजकीय आणि गुप्तचर यंत्रणांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच हे पुस्तक वाचकांना केवळ माहिती देत नाही, तर त्यांना विचार करण्यास भाग पाडतं की, या हत्येच्या मागे खरंच कोणते घटक कार्यरत होते?
राजीव गांधी यांच्या जीवाला धोका आहे, असे गुप्तचर यंत्रणेकडून इशारे मिळत असताना, पी. चिदंबरम हे सातत्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत असताना केवळ एकच बिनहत्यारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. नंतर खूपच मागणी झाली म्हणून दुसरा हत्यार असलेला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला पण नेमकं ज्यावेळी हत्या झाली तेव्हा तो सुरक्षारक्षक घटनास्थळी नव्हता.
दिग्गजांकडे संशयाची सुई
राजीव गांधी यांच्या जीविताला धोका असल्याचे पत्र चिदंबरम हे वारंवार देत असत. त्यावर अनेक महिने गुप्तचर विभागाचे तत्कालीन संचालक एम के नारायणन यांनी काहीच भूमिका घेतली नाही. परंतु, हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे 20 मे रोजीपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि त्यादिवशी राजीव गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस करण्याचं पत्र त्यांनी गृह मंत्रालयाला पाठवलं. नारायणन यांनी सुटीचा दिवस निवडला. त्यामुळं त्या पत्रावर काहीच कारवाई झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी ही दुदैर्वी घटना घडली.
जबाबदार लोकांवर कारवाई लांबच भविष्यात त्या सर्वांना मोठमोठी लाभाची पदंही तत्कालीन त्या-त्या वेळच्या सरकारने दिली आहेत.
या पुस्तकात तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर, मंत्री सुब्रमण्यम स्वामी, काँग्रेसचे काही नेते, तांत्रिक चंद्रास्वामी यांच्यासह अनेकांवर संशयाची सुई वळवली आहे. इतकंच काय जे दोन आयोग म्हणजे न्या. वर्मा आयोग आणि न्या. जैन आयोग यांच्या अहवालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यात अनेक तथ्यं मांडण्यात आली आहेत.
"राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?" हे पुस्तक राजकीय इतिहास, गुप्तचर यंत्रणा आणि षड्यंत्र सिद्धांतांमध्ये रस असलेल्या वाचकांसाठी निश्चितच वाचनीय आहे. हे पुस्तक वाचकांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करतं आणि राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते.
हे पुस्तक रोहन प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
-दिग्विजय जिरगे
9890224339, divijay.jirage@gmail.com


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा