कोरोना संपणार..पण पिळवणूक अटळ..



येणाऱ्या काही दिवसांत कोरोना (CoronaVirus) विषाणू निघूनही जाईल. पण त्यानंतर ज्या अडचणी सुरु होणार आहेत, त्या कल्पनेपलिकडच्या असू शकतील. सध्या यात हातावर पोट असणारे भरडले जात आहेत. त्यानंतर वेळ येईल खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची. मार्च-एप्रिल महिना उजाडताच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागलेले असतात. म्हणजे अप्रायझलसाठी या काळाची सर्वचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. बहुतांश ठिकाणी सालाबादप्रमाणे यासाठीचे सर्व सोपस्कार सुरु होते. पण मध्येच या कोरोना विषाणूरुपी किड्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम व्यवस्थित केले आहे. दरवर्षी 'कॉस्ट कटिंग'चे कारणे देऊन किरकोळ पगारवाढ केली जात. यंदा पगारवाढ लांबच पगार कपातीची भाषा आत्ताच बोलली जात आहे. किंबहुना नोकरीच धोक्यात आली असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईएमआय, जबाबदाऱ्या या इतर आर्थिक गोष्टींमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे कोणाच्याच हाती काही नाही, अशी परिस्थिती सध्यातरी आहे.

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे खऱ्या अर्थाने पिळवणुकीचे दिवस आता सुरु होणार आहेत किंबहुना सुरु झाले आहेत. देशभरात सुरु असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घरी बसून अनेकजण वैतागल्याचे व्हिडिओ, जोक्स सोशल मीडियावर येत आहेत. म्हणजे सर्वकाही 'सुशेगात' सुरु आहे, असेच सर्वांना वाटत असेल. पण वस्तुस्थिती तशी नाही..

सध्या 'वर्क फ्रॉम होम' (WFH) म्हणजे घरुन काम करणारी खासगी क्षेत्रातील एक जमात कार्यरत आहे. १२-१२ तास बुडाला फोडं येईपर्यंत कामासाठी बसूनही वरिष्ठांकडून ऐकून घेणाऱ्या या WFH कम्युनिटीलाच माहीत असेल त्याचं दुःख...


जेव्हा सर्व काही सुरळीत होईल, तेव्हा या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा (कामगारांचा) वाईट काळ सुरु होईल. नोकरी जाईल या भीतीपोटी अनेकांना सर्व सहन करण्यावाचून काही पर्याय नसेल. कारण त्यावेळी निम्म्या पगारात काम करणारी अनेक मंडळी उपलब्ध आहेत, अशी भीतीदायक वाक्यं त्यांना ऐकावी लागणार आहेत. कामाचे तास वाढवणार, सुट्ट्या रद्द होणार.. कदाचित अनेकांना हे नकारात्मक वाटेल... पण ही वस्तुस्थिती आहे.. हाही काळ जाईल या आशेवर कार्यरत राहावे लागणार आहे..काळच यावर उत्तर देईल...

- दिग्विजय जिरगे
Digvijay Jirage

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'