बालाजी वेफर्स, भाजी मंडई आणि लादेन

CODE NAME GERONIMO हा हॉलिवूडचा लादेनवरील चित्रपट उत्सुकतेपोटी पाहिला. पण चित्रपटाने घोर निराशा केली. हॉलिवूड पट खूप शिस्तीत आणि तयारीने केलेले असतात असं ऐकलंय.. पण या चित्रपटात असं काही झालं नसल्यासारखं दिसतं.. अमेरिकेबाहेरचं शुटिंग बहुधा सेकंड डायरक्टेरनं केलं असावं किंवा शुटिंग करताना ज्या गोष्टी टाळायला हव्यात त्याकडं दुर्लक्ष केलं असावं. चित्रपटाच्या सुरूवातीला काही चांगलं पाहायला मिळेल असं वाटलं होतं.. पण.. काही प्रसंग हे हिंदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे आहेत..
पण चित्रपटातील सर्वांत दुबळी आणि वाईट गोष्ट म्हणजे चित्रपटासाठी पाकिस्तानमधील पेशावर, अबोटाबाद येथील जे प्रसंग दाखवले आहेत.. ते सर्व महाराष्ट्रातील आहेत.. ते असण्याबद्दल आक्षेपही नाही.. पण हॉलिवूडकरांनी एवढा मोठा चित्रपट बनवताना थोडीही काळजी घेतली नाही याचेच आश्चर्य वाटते. पाकिस्तानी कलाकारच्या भूमिकेत मराठी अभिनेते राजेश शृंगारपुरे, दुसरा एक ओळखीचा चेहरा आहे. शिवाय हर्ष छायांसारखा एक अनुभवी कलाकारही आहे. पण त्यांची भूमिका अवघ्या काही सेकंदाचीच आहे.

पाकिस्तानातील जो पहिला प्रसंग दाखवलाय तिथंच हास्यास्पद अनुभव आला.. एका हॉटेलात चार-पाच पाकिस्तानी लोकांचा समूह बसलेला दाखवलाय (हॉटेलंच नाव भारतीय असल्याचं जाणवलं). राजेश शृंगारपुरे हॉटेलबाहेरील पान टपरीवर सिगारेट घेतोय.. त्या पान टपरीवर बालाजी वेफर्सची पाकिटं टांगलेली दिसतात.. तिथून सगळा मामला फिसकटल्याचं दिसतं. चित्रपटात वापरण्यात आलेली वाहने ही एमएच ०६ क्रमांकाची आहेत. एका प्रसंगात कलाकार तो नंबर अमेरिकेत बसलेल्या सीआयएच्या एजंटलाही सांगतो. चित्रपटात महाराष्ट्रातील काळया पिवळ्या रिक्षा, महाराष्ट्रीयन पेहरावातील महिला, MS-CIT प्रशिक्षण संस्थेच्या जाहिराती, एका प्रसंगात तर एका नागरी सहकारी बँकेची मराठीतील जाहिरात ही फ्रेम मध्ये चुकून आल्याचं दिसते..
लादेनच्या कुटुंबीयांचा पाठलाग करत सीआयए एजंट मार्केटमध्ये गेलेले दाखवलं आहे. मार्केटमध्ये फिरताना भाजीवाल्याच्या दुकानावर चक्क तिरंगा दाखवण्यात आलाय (शुटिंग पाकिस्तानातील आहे बरं का).. कदाचित त्यांच्या हे लक्षात आलेलं नाही..
चित्रपटाची भट्टी बिघडल्यासारखी वाटते.. माझ्या माहितीप्रमाणे लादेनवर काही हॉलिवूडपट निघाले आहेत.. ती पाहिलेली नाहीत अजून.. पण हा चित्रपट यथातथाच आहे..
(आणखी एक पाकिस्तानी सीआयए एजंटला जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा एक पोलीस अधिकारी येऊन त्या सीआयए एजंटनां सोडून देण्याचे आदेश देतो. मला वाटतं ते अधिकारी वास्तवात सोलापूर येथे कार्यरत असलेले एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकच असावेत.. कारण ते चित्रपटांमधून काम करत असतात असं ऐकलंय)

- दिग्विजय जिरगे
divijay.jirage@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'