सचिन नावाचा 'बाप' माणूस!

सचिनने निवृत्ती घेतली आणि तमाम क्रिकेट चाहत्‍यांनी हळहळ व्‍यक्‍त केली. प्रत्‍येकाला जसा आश्‍चर्यचा धक्‍का बसला तसा तो मलाही बसला. सचिन निवृत्ती घेणार असल्‍याची चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून माध्‍यमांमध्‍ये येत होती (तशी ती गेल्‍या अनेक वर्षांपासून होतीच, पण यावेळेसची बाब जरा वेगळीच). तरीसुद्धा त्‍याने निवृत्ती घेतल्‍यानंतर सगळं काही अनपेक्षितरित्‍या घडलं. त्‍यामुळे त्‍याच्‍या निवृत्तीचा निर्णय पचनीच पडत नाहीये. मागील काही दिवसांत सचिनची कामगिरी खालावली होती. ती पाहता सचिनने आता निवृत्ती घेतलीच पाहिजे, असे म्हणणारे जसे अनेक होते. तसेच त्‍याने निवृत्तीचा निर्णय आताच का घेतला, असे म्‍हणणारेही अनेकजण आहेत.

सचिनने क्रिकेटच्‍या मैदानात किती विश्वविक्रम केले आणि सामनावीर पुरस्‍कार कितीवेळा मिळवले, हे आता सर्वांनाच माहिती आहे. त्‍यामुळे ते सांगण्‍याचे इथे काहीच प्रयोजन नाही. याची माहिती क्रिकेटरसिकांना वेगवेगळया माध्‍यमातून मिळत आली आहेच.

सचिन तेंडुलकर नावाचे गारूड माझ्या पिढीच्या मनावर कधीपासून राज्‍य करायले लागले हे लक्षातच आले नाही. लहानपणी क्रिकेटचा 'क' कळण्‍यापूर्वी सचिनचा 'स' मोठया प्रमाणात ठसला होता. तेव्‍हापासूनच आम्‍ही स्‍वत:ला गल्‍लीतला सचिन समजून खेळू लागलो. घरात केबलचे कनेक्‍शन नसल्‍यामुळे त्‍याची फलंदाजी पाहण्‍यासाठी मित्रांच्‍या घरी रात्रभर थांबणारे आम्‍हीच, त्‍याच्‍या एक-एक धावेसाठी टाळया पिटणारेही आम्‍हीच, त्‍याच्‍या लवकर बाद होण्‍यावर खणखणीत टीका करणारेही आम्‍हीच, त्‍याच्‍या नेतृत्‍वात आक्रमकपणाच्‍या अभावाबद्दल बोलणारेही आम्‍हीच, त्‍याने आता रिटायरमेंट घेतली पाहिजे म्‍हणणारेही आम्‍हीच आणि त्‍याने रिटायरमेंट घोषित केल्‍यानंतर त्‍याने घाई केली, असे म्‍हणणारेही आम्‍हीच. सचिनबद्दलचा माझ्या पिढीचा हा विरोधाभास की त्‍याच्‍यावरील हे अतिप्रेमाचे लक्षण याचाच आम्‍हाला प्रश्‍न पडतो.

सचिनने शतक केल्‍यावर आम्‍हा मंडळीच्‍या 'कमिट्या' कट्ट्यावर बसायच्‍या आणि तिथे मोठ-मोठया आवाजात चर्चा झडायच्‍या. प्रत्‍येकजण आपली मते मांडायचा. त्‍यावेळीही त्‍याची बाजू घेणारे अनेकजण होते. विरोधावर बोलणारे तसे कमीच. आम्‍ही त्‍याला प्रेमाने 'तेंडल्‍या' म्‍हणायचो. हक्‍काने त्‍याच्‍याकडून शतकाची अपेक्षा करायचो. त्‍यानेच चांगली गोलंदाजी करायची, त्‍यानेच शतक ठोकायचे, त्‍यानेच कॅच पकडायची. एकाकडूनच किती अपेक्षा ठेवयाचे याचे आम्‍हाला कधी भानच राहायचे नाही. त्‍यामुळे तो अपयशी ठरला तर लगेच त्‍याच्‍यावर आगपाखड करायचो. काय म्‍हणायचे याला ?

शारजामध्‍ये झिम्‍बाब्‍वेच्‍या हेन्‍री ओलोंगा, ऑस्‍ट्रेलियाच्‍या मायकल कॉस्‍प्रोविज आणि डॅमियन फ्लेमिंगची गोलंदाजी फोडून काढताना ज्‍यांनी ज्‍यांनी पाहिले आहे त्‍यांच्‍या डोळयाचे पारणे फिटले असेल. त्‍याच्‍या त्‍या खेळी मी कधीच विसरू शकत नाही. विंडीज-ऑस्‍ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील कसोटी भारतात पहाटे दिसतात. त्‍यावेळेस भल्‍या पहाटे उठून आम्‍ही सचिनची फलंदाजी पाहयचो. तेव्‍हा जशी आमची त्‍याच्‍याबद्दल भावना होती आजही तशीच आहे. मध्‍यंतरी त्‍याच्‍या निवृत्तीबाबत सोशल नेटवर्किंगच्‍या आणि एसएमएसच्‍या माध्‍यमांत अनेक जोक्‍स पसरले होते. काय वाटले असेल त्‍याला ?

त्‍याने कधीही आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या नाहीत. तरीही आम्‍ही नाराज, पण आता त्‍याने घेतलेला निर्णय हा भावनेच्‍या भरात घेतल्‍यासारखा वाटते, असे काहीजण आता म्‍हणतात. सचिनचे कौतुक करण्‍यासाठी हा प्रपंच नाही. कारण कौतुक हा शब्‍दही त्‍याच्‍यासमोर खुजा ठरतो. सचिनने मैदानातील वावराने अनेक असामान्‍य विक्रम आपल्‍या नावे केली आहेत. परंतु, त्‍याचा फॉर्म हरपल्‍यापासून सगळयांचीच बोटे त्‍याच्‍याकडे रोखली जाऊ लागली. ज्‍या क्रिकेटपटूंना त्‍यांच्‍या कारकीर्दीत रिटायरमेंट घ्‍या म्‍हणून मागे लागावे लागले होते. तेच आता त्‍याला असा सल्‍ला देताना दिसले. (हे जरा अतीच म्‍हणावं)

सचिनने पाकिस्‍तानविरूद्धची वनडे मालिका खेळावी, असे प्रत्‍येकाची इच्‍छा होती. परंतु, ज्‍यांनी प्रेम केले त्‍यांनीच नंतर सुरू केलेली टीका, माध्‍यमांमध्‍ये झडू लागलेल्‍या 'विशेष' चर्चा यामुळे दबावात आलेल्‍या सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतल्‍याचे आता बोलले जात आहे. सचिनची बॅट आता फक्‍त कसोटीतूनच तळपताना पाहायला मिळेल.

कुटुंबातील मोठी व्‍यक्‍ती ज्‍याप्रमाणे कधी कशाबद्दल तक्रार करत नाही. कधी कोणाबद्दल बोलत नाही, त्‍याच्‍या मनात काय चालले आहे हे कधीच कोणाला कळत नाही. अगदी तसेच सचिनच्‍या बाबतीत म्‍हणता येईल. त्‍याने आपल्‍या रिटायरमेंट बाबतीत कोणाशी चर्चाही केली नाही. आणि अनपेक्षितपणे आपल्‍या निवृत्तीची घोषणा केली. ही घोषणा करतानाही त्‍याने आपल्‍या या स्‍वभावाचे प्रत्‍यंतर दिले. म्‍हणूनच तो क्रिकेटमधील 'बाप' माणूस ठरतो !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'