'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय झोल. टीम इंडियाला अंडर 19 चे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभाणा-या विजयची घेतलेली मुलाखत...
'विजय झोल' गेल्या एक-दोन वर्षांपासून क्रिकेटच्या क्षितिजावर सतत झळकणारे हे नाव. मराठवाड्यातील जालना सारख्या एका छोटयाशा शहरातून क्रिकेटसाठी कोणत्याही प्रकारचे पोषक वातावरण नसतानाही फक्त गुणवत्तेच्या जोरावर पुढे आलेला हा खेळाडू. मैदानात फलंदाजीस गेल्यानंतर खंडीभर धावा केल्याशिवाय परत न येणारा खेळाडू अशी त्याची क्रिकेटच्या दुनियेतली ओळख. 'सातत्य' म्हणजे विजय झोल हे आता समीकरणच बनले आहे. आपल्या फलंदाजीतील सातत्यामुळे प्रत्येकाच्या ओठावर त्याचे नाव आहे. आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वडील हरी झोल हेच आपले आयकॉन असल्याचे सांगणारा विजय आपल्या खेळाचे सर्व श्रेय जालन्याचे प्रशिक्षक राजू काणे यांना देतो.
विजय पहिल्यांदा प्रकाशझोतात आला कुचबिहार करंडकातील 451 धावांच्या नाबाद विक्रमी खेळीमुळे. आपल्या डावखु-या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणा-या विजयने ऑस्ट्रेलियातील 19 वर्षाखालील वनडे मालिकेतही धावांचा रतीब सुरूच ठेवला. 19 वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरोधात प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या 36 धावांमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. त्याचा हाच फॉर्म देशातंर्गत क्रिकेटमध्ये कायम आहे. विनू मंकड करंडक आणि आंतरविभागीय सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळताना अर्धशतकीय खेळी केली. त्याच्या अशा अनेक मोठया खेळया सांगता येतील. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून मारलेला त्याचा स्वेक्अर ड्राईव्हचा फटका पाहण्यासारखा असतो. जिल्हास्तरीय स्पर्धेतून सुरू झालेला त्याचा क्रिकेटचा प्रवास देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा ते 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा व्हाया आयपीएल असा सुरू आहे. नुकताच त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा 19 वर्षाखालील उत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त त्याच्याशी मारलेल्या क्रिकेट गप्पा.
आमच्या घरात खेळाडू कोणी नसले तरी माझ्या मोठया भावाला आणि वडीलांना क्रिकेटची प्रचंड आवड आणि ज्ञान होते. त्यामुळे आपसूकच क्रिकेटकडे मी आकर्षित झालो. लहानपणापासून म्हणजे अवघ्या 7 वर्षांचा असल्यापासून मी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. जालनासारख्या छोटया शहरात राहत असल्यामुळे क्रिकेटला लागणारे पोषक वातावरण असे नव्हते. मात्र, वडीलांनी मला कायम प्रोत्साहन दिले. त्यांनी कधीच कुठलीही कमतरता भासू दिली नाही. माझ्या क्रिकेटमध्ये कसलाच अडथळा येऊ नये म्हणून माझ्या शाळा सोडण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. आई वडीलांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, असे सुरूवातीलाच विजयने सांगितले.
विजय म्हणाला, क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी वडिलांनी शहरातील काणे अॅकेडमीमध्ये मला दाखल केले. काणे अॅकेडमीचे राजू काणे हेच माझे पहिले प्रशिक्षक. त्यांनी माझ्यातील गुणवत्ता हेरून मला कायम प्रोत्साहन दिले. त्यांनी दिलेल्या प्रत्येक टिप्स मी पुरेपूर अंमलात आणल्याचा मला फायदाच झाला.
माझे प्रशिक्षक राजू काणे मला नेहमीच प्रोत्साहन देत. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत महत्वाची असते. यशासाठी शॉर्टकट कधी नसतो. क्रिकेटमध्ये संधी कमी मिळते. जी संधी मिळेल ती शेवटची संधी समजूनच खेळ, असा सल्ला ते मला नेहमी देत. त्यामुळे प्रत्येक सामना खेळताना मी शेवटची संधी म्हणूनच खेळत असतो. त्याचा चांगला परिणाम माझ्या खेळावर झाला. काणेसरांच्या प्रशिक्षणामुळेच खेळात सातत्य राखता आले.
आपल्या आवडी-निवडीबद्दल बोलताना विजय म्हणाला, वेगवेगळया स्पर्धा, कॅम्पमुळे मी कायम घरापासून दूर असतो. पण जेव्हा-केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सरळ जालन्याला घरी जातो. आणि पूर्ण वेळ कुटुंबियांसोबत घालवतो. घरच्यांना वेळ देणं मला आवडतं. क्रिकेटशिवाय मला टेबल टेनिसही खेळायला आवडते. मोकळा वेळ मिळाल्यास मी टेनिस खेळतो. पण माझा बहुंताश वेळ हा प्रवासात जातो.
आपल्या आयकॉनबद्दल विजय भरभरून बोलला, वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेटमधील माझा आयकॉन खेळाडू आहे. त्याच्याकडे पाहूनच मी क्रिकेटकडे आकर्षित झालो. आक्रमकपणा, दमदारपणे पुनरागमन करण्याच्या त्याच्या क्षमतेने मला कायम आकर्षित केले. त्याचबरोबर माझे वडीलही माझे आयकॉन आहेत. त्यांनी ज्यापद्धतीने मला घडवले, पाठिंबा दिला त्याची तुलनाच होऊ शकत नाही.
माझा आयकॉन म्हणजे सेहवागने जेव्हा त्याची स्वत:ची बॅट मला भेट दिली, तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. तो माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे.
अंडर 19 विश्वचषकातील आठवणी सांगताना विजय जरा खुलला. तो म्हणाला, टीम इंडियाची जर्सी घालणे स्वप्न होते. ते स्वप्न ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्वचषकामुळे पूर्ण झाले. संपूर्ण स्पर्धेत माझी कामगिरी समाधानकारक झाली. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानविरूद्धचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कमालीचा दबाव होता. पण आम्ही सर्वांनी जिकांयचच ठरवलं होतं. लो स्कोअरिंग सामना झाला होता. त्यावेळी पाकच्या 136 धावांचा पाठलाग करताना, टीम इंडियाच्या 3 बाद 8 धावा झाल्या होत्या. त्यावेळी बाबा अपराजितच्या मदतीने संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला, त्याचे समाधान मोठे होते. विश्वचषकात खेळणे एक अनोखा अनुभव होता.
या स्पर्धेत उन्मुक्त चंद सारख्या चांगल्या क्रिकेटपटूबरोबर खेळायला मिळाले. उन्मुक्त एक उत्कृष्ट आणि अनुभवी कर्णधार तसेच आक्रमक खेळाडू आहे. त्याच्याबरोबर खेळणे एक वेगळाच अनुभव होता, असे त्याने सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकताच 19 वर्षाखालील उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार मला दिला. अशा पुरस्कारामुळे आणखी प्रोत्साहन मिळते. खेळात सातत्य ठेवण्यासाठी एक ऊर्जा प्राप्त होते.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून मी खेळतो. प्रत्यक्षात सामना खेळण्यास संधी मिळाली नसली तरी आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर सराव करण्याचा आणि त्यांच्याबरोबर क्रिकेटवर चर्चा करण्याची मिळालेली संधी माझ्यादृष्टीने खूपच मोठी आहे. या खेळाडूंकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते त्यामुळे खेळात सुधारणा करता येते, असेही विजय म्हणतो.
महाराष्ट्राकडून रणजी सामने खेळणे हे माझे पहिले ध्येय आहे. त्यानंतर आपल्या खेळाने भारतीय संघात जाण्याचे स्वप्न आहे. ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मी भरपूर सराव करीत आहे. आणि प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, असे त्याने शेवटी सांगितले.

best. good work..
उत्तर द्याहटवा