... आणि बाळासाहेबांना पुन्हा भेटण्याची इच्छा अपुरीच राहिली
महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू सुवर्णा बारटक्के हिची घेतलेली मुलाखत...
कबड्डी खेळात महाराष्ट्राची विशाल अशी परंपरा आहे. चपळ हालचाल, श्वास रोखून धरण्याची क्षमता, समयसूचकता, सांघिक कौशल्य आणि यासर्वांसाठी लागणारी शाररिक क्षमता महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये ठासून भरलेली दिसते. या खेळात महाराष्ट्राच्या मातीने अनेक मोहरे देशाला दिले. पुरूषांबरोबरच महिला खेळाडूंनीही ही गौरवशाली परंपरा कायम ठेवली. त्यातीलच एक नाव सुवर्णा बारटक्के (Suvarna Bartakke). कबड्डी हाच श्वास असलेल्या सुवर्णाने मार्च महिन्यात झालेल्या पहिल्या महिला कबड्डी विश्वचषकाचे भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. तिच्या या यशाबद्दल जाणून घेण्यासाठी जेव्हा सुवर्णाला फोन केला तेव्हा बोलता बोलता आपसुकच बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) विषयही निघाला. मग गत आठवणींना उजाळा देताना भावुक झालेल्या सुवर्णाने भविष्यात चांगली कामगिरी केल्यानंतर बाळासाहेबांचे आर्शिवाद घेता येणार नाही, अशी खंत व्यक्त केली.
भाऊ कबड्डीपटू त्यामुळे या खेळाविषयी घरातूनच प्राथमिक धडे
मिळालेल्या सुवर्णाला घराशेजारी होणा-या शिवनेरी कबड्डी स्पर्धेने कायम
आकर्षित केले. आणि या आकर्षणातूनच घडली एक आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास सोपा
नव्हता. यासाठी तिने अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत
स्वत:ला सिद्ध केले. त्याचवेळी तिने आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचेही
लक्ष्य ठेवले होते. आणि हे स्वप्न तिने पाटणा येथे झालेल्या पहिल्या
विश्वचषकात प्रत्यक्षात आणले. विश्वचषकातील अनुभवाविषयी सुवर्णा भरभरून
बोलते. मातीवर खेळण्याची सवय आणि आवड असलेल्या सुवर्णाने खास
विश्वचषकासाठी अनेक दिवस मॅटवर कठोर सराव केला. त्याचे फळ तिला
प्रत्यक्ष स्पर्धेत मिळाले. तिने आपल्या अव्वल कामगिरीने सर्वांचे लक्ष
वेधून घेतले. तिच्या या कामगिरीची दखल महाराष्ट्र सरकारनेही घेतली.
सुवर्णासह स्पर्धेत सहभागी झालेल्या दिपिका जोसेफ आणि अभिलाषा
म्हेत्रेला एक कोटीचे बक्षिसही जाहीर केले. (अद्याप ही रक्कम तिला मिळू
शकलेली नाही)
स्वत: अव्वल खेळाडू असलेल्या सुवर्णाला विदेशी खेळाडूंच्या
तंत्राबाबत विशेष आकर्षण आहे. त्यातल्या त्यात जपानी खेळाडूंचा वेग तिला
खूप भावतो. त्यांच्याकडूनही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
कबड्डी खेळाप्रती सरकारचा दृष्टीकोनही सध्या बदलल्याचे तिने
सांगितले. ती म्हणाली, ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये
प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांची
'वर्ग अ' पदी निवड केली जाते. त्यामुळे नवीन क्रीडापटूंना निश्चितच यातून
प्रेरणा मिळते. विशेष म्हणजे सुवर्णालाही ही संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याविषयीची आठवणही तिने यावेळी
आवर्जुन सांगितली. विश्वचषक पटकाविल्यानंतर सर्वात प्रथम तिने मातोश्रीवर
जाऊन सेनाप्रमुखांची भेट घेतली होती. 'बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याचा
अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. ज्यांना लहानपणापासून पाहत होतो. त्यांना
आज प्रत्यक्षात भेटायला मिळणार या कल्पनेनेच मनावर कमालीचे दडपण होते.
बाळासाहेब काय बोलतील, कशी वागणुक देतील या विचारानेच गर्भगळीत झाले होते.
मात्र, बाळासाहेबांनी सुरूवातीलाच वातावरण खेळीमेळीचे केले. आमची आपुलकीने
विचारपूस केली. विश्वचषकातील प्रतिस्पर्धी संघाविषयी आमच्याशी चर्चा
केली. अनुभव विचारला. स्पर्धा कशा झाल्या, याविषयी मनसोक्त गप्पा
मारल्या. सरकार तुम्हाला एका कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देणार आहे. ती
मला द्याल काय? असे म्हणत आमची फिरकीही घेतली. जेव्हा त्यांना भेटून
आम्ही बाहेर पडलो, तेव्हा खूप बरं वाटले.
मात्र, आणखी एका स्पर्धेत चमकदार कामगिरी करून त्यांना पुन्हा
भेटण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली. ती सल मात्र मला कायम बोचत राहील,
असे तिने यावेळी म्हटले.
ज्यांना क्रीडा क्षेत्रात करीअर करायचे आहे. त्यांना कठोर
मेहनतीशिवाय पर्याय नाही. सरावात सातत्य ठेवले तरच यश आपल्या हाती येईल,
असा मोलाचा सल्ला तिने नवोदितांना दिला.
सुवर्णा सध्या देना बँकेकडून कबड्डी खेळते. तसेच शिवशक्ती महिला
कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्वही करते. आगामी 2014 च्या एशियन
स्पर्धेमध्ये खेळण्याचे तिने लक्ष्य ठेवले आहे. आणि त्यासाठी तिने
कसून सरावही सुरू केला आहे. ही स्पर्धाही तिने आपल्या चमकदार कामगिरीने
गाजवावी यासाठी आणि भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा
!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा