नकटीच्‍या लग्‍नाला.....

औरंगाबादमध्‍ये येऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत अनेक संकल्‍प केले. काही तडीस नेले, काही नेण्‍याचा प्रयत्‍न केला. काही तर क्षणातच विसरला गेलो. पण एक इच्‍छा किंवा संकल्‍प अजूनही मनात घर करून आहे. तो म्‍हणजे सकाळी लवकर उठून मोकळया वातावरणात फिरायला जाण्‍याचा (जरासं वजन वाढल्‍यामुळे). कारण इथे आल्‍यापासून अनेक गोष्‍टी मी हरवून बसलोय. सकाळी एकदा ऑफिसला गेल्‍यानंतर रात्री फ्लॅटवर कधी जाईल याची मलाच माहिती नसते. कारण तिथे जाऊन तर काय करणार हा ही मोठा प्रश्‍नच. जाऊ दे खूप भरकटतोय, माझ्या वरच्‍या संकल्‍पासारखा. त्‍यामुळे परत मुद्यावर येतो. तर सकाळी लवकर उठून फिरायला जाण्‍यासाठी झोपताना अनेकवेळा ठाम ठरवलं. पण स्‍वत: झोपण्‍याबरोबरच तो संकल्‍प देखील तेव्‍हाच झोपायचा. त्‍यामुळे मग सकाळी उठल्‍यानंतर ऑफिसच्‍या टाईमिंगप्रमाणे थोडाफार व्‍यायाम तो ही कधीतरी (म्‍हणजे माझ्या पद्धतीने थोडे फार हात-पाय वाकडे करणे, दोन-तीन उडया मारणे आणि मोजून 20-25 जोर मारणे) करणे. त्‍यातही सातत्‍य नव्‍हते.
जुन्‍या फ्लॅट पार्टनरबरोबर अनेकवेळा याबाबत मोठया लंबयाचौड्या गप्‍पादेखील (म्‍हणजे रोज व्‍यायाम करायला पाहिजे, आपलं नंतर कसं होईल वगैरे वगैरे...) मारल्‍या. पण कृती शून्‍य. सध्‍या आमच्‍या फ्लॅटमध्‍ये माझा एक नवा सहकारी आला जो माझ्याप्रमाणेच (कदाचित थोडासा कमी) तब्‍येतीचा. पण पक्‍का दृढनिश्‍चयी (सध्‍यातरी वाटतोय), तो याबाबतीत जागरूक आहे. रोज मोजूनच खातो, जेवल्‍यानंतर शतपावली करतो, सकाळी लवकर उठून 5-7 किलोमीटर चालत जाऊन येतो. त्‍यामुळे माझाही हुरूप वाढला. त्‍याच्‍या निमित्ताने मलाही माझ्या थोडयाशा 'बेढब' वाटणा-या शरीराला वळण देता येईल असे वाटले. मग मीही त्‍याला सकाळच्‍या सत्रास जॉईन होण्‍याचा निर्णय घेतला. तसा तो महिन्‍याभरापूर्वीच घेतला होता. पण माझी नाईट डयुटी नंतर सुट्टी घेऊन सोलापूरला घरी जाणे, नंतर तो त्‍याच्‍या गावी जाणे यामुळे मला त्‍याच्‍या उपक्रमात 'शरीक' होता आले नाही.
पण काल पक्‍का निर्णय केला की उद्या सकाळी फिरायला जायचंच. त्‍याप्रमाणे त्‍याने मला सकाळी उठवलेही. पण चांगल्‍या कार्यात विघ्‍ने कशी येतात त्‍याचं मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे, माझा आजचा दिवस. सुदैवाने सकाळी लवकर उठलो म्‍हणजे बरोबर 6 वाजता. पण दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडल्‍यापासून नेमके आमच्‍या अर्पाटमेंटमध्‍येच पाणी टंचाई जाणवू लागल्‍याचे जाणवले. कारण सकाळी फ्लॅटमध्‍ये नळाला पाणीच नाही. आणि पाण्‍याशिवाय आपलं काही चालत नाही. काही वेळ वाट पाहिली (ते पाणी येणार होते 7.30 वाजता, हे नंतर कळले). कारण त्‍याशिवाय गत्‍यंतर नव्‍हते. काही गोष्‍टी झाल्‍याशिवाय पुढची कामे होत नाही. तशातल्‍या हा प्रकार. मग परत जो मी झोपलो. तो थेट 8 च्‍या दरम्‍यानच उठलो. पुन्‍हा एकदा माझ्या संकल्‍पाचा टांय टांय फिस्‍स झाला. (‍विशेष म्‍हणजे सकाळी फिरायला जाण्‍यासाठी मी ट्रॅक पँट,शूज आणि टी-शर्ट आणून ठेवला आहे. आणि या सर्व वस्‍तू आहे तशाच धूळही न लागता पडून आहेत.)
त्‍यामुळे माझा संकल्‍प सध्‍या संकल्‍पच आहे. असा संकल्‍प मी सोलापूरला करायचो. तो तडीसही न्‍यायचो. जरी तो हंगामी असला तरी. पण मी येथेही तो पूर्ण करणार येणा-या दिवसात. बघूयात फक्‍त तो दिवस केव्‍हा येतो ते.... (म्‍हणजे मी जो काही थोडाफार दिवस औरंगाबादेत आहे तोपर्यंत तरी.)

टिप्पण्या

  1. दिग्गी... सकाळी लवकर उठून वॉकला जाण्याचा माझा संकल्प मीही औरंगाबादेत आल्यापासून करत आलो. पण, गेल्या नाइट शिफ्टमध्ये माझी मान मुरगळली आणि डॉक्टर वारी झाली तेव्हा त्यांनी सक्तीने सकाळ संध्याकाळ तासभर चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आणि एक सप्टेंबरपासून मी संकल्प नव्हे सल्ला आंमलात आणण्यास सुरुवात केली आहे... बघूया आजार बरा होईपर्यंत सल्ला आंमलात येतो का ते... तुमच्याही संकल्पाला शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा
  2. संकल्पाला शुभेच्छा...पण तो लवकरात लवकर तडीस न्यावा, हीच अपेक्षा. आज आपण सुरुवात केलीत ते चांगले झाले. पण हा उत्साह कायम राहू द्या. तुमच्या संकल्पाचा अस्मादिकांनाही फायदा झाला. तो असा की, मी रोज एकता जायचो. आता तुझ्यासारखा चांगला मित्र मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  3. मित्र दिग्विजय,संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा..!
    Keep it Up
    तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर 'सगळेच मुसळ केरात', असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. जर तुम्हाला जिवंत उदाहरण पाहायचे असेल तर... तुम्ही माझ्याकडे पाहू शकता..!

    उत्तर द्याहटवा
  4. डियर दिग्गी दादा
    ब्लॉग वाचला , खूप छान. असेच लिहिते राहा, सोलापूर गडावर याल तेव्हा भेटत राहा.
    अजित

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'