आमचा विसरभोळा भाई !
शीर्षक वाचून तुम्हाला मी महाराष्ट्रातील लाडके व्यक्तीमत्व पुलं विषयी बोलत असेल असं वाटेल. पण तसं नाही (कानाला हात लावून) मी ज्या भाईविषयी सांगणार आहे तोही काही असा-तसा नाही. तोही तोडीस तोड आहे (म्हणजे गुंड वगैरे नाही, गैरसमज नको). हे भाई कसे आहेत हे तुम्हाला पुढं लक्षात येईलच. आमचा भाई म्हणजे उन्मेष खंडाळे.
उन्मेष हे त्याचे नाव आहे. सुरूवातीला भाई कसा लागला मला माहीत नाही. पण सगळे पूर्वीपासूनच त्याला भाई म्हणतात. मला अनेकवेळा उत्सुकता होती भाई नावाचा इतिहास जाणून घेण्याची पण विचारायचे राहूनच गेले (कदाचित आता माहित होईल, असे गृहीत धरतो). उन्मेषला 'भाई' ही उपाधी खूप प्रिय आहे. याची प्रचिती तुम्ही त्याला फोन लावल्यानंतर लक्षात येईल. रेकॉर्डरूपी बाई समोरून सारखं भाई उन्मेषला फोन लावल्याबद्दल आपले आभार मानीत असते.
त्याशिवाय त्याचं फेसबुक प्रोफाईलही 'भाई' या नावानेच सुरू होते.(यावरून तुम्हाला पुसटशी कल्पना येईल). भाईविषयी अधिक सांगायचं म्हटलं तर तो आणि मी समवयीनच आहोत. पण तो गेल्या पाच-साडेपाच वर्षांपासून पत्रकारितेत आहे. सुरूवातीला प्रिंट मीडियामधून सुरू केलेला प्रवास व्हाया इलेक्ट्रॅनिक मीडिया असं करत आता इंटरनेट आवृत्तीत स्थिरावतोय. त्यामुळे तो आमचा गुरूबंधूच आहे. याचं वाचन ही भरपूर आहे. (असणारचं कारण घरची लायब्ररी आहे)
तर आमचे भाई हे लंबे चौडे असे गौर कांती आणि गौर केसाचे (गौर केस म्हणजे पांढरे केस पण त्यावर लाल रंगाचा मुलामा दिलेले) व्यक्तीमत्व. ते बोलतानाही आम्हाला आकाशवाणीवरील एखादी उदघोषणा ऐकायला सारखं वाटते. (उदा. आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र आहे. आपण ऐकत आहात... अशा टाईपचं) कमालीचं शांत (वरवर तरी वाटतं) असा. आमचा भाई जेवढा शांत तेवढाच (कदाचित जास्त) विसरभोळा.
खरं तर या लेखाचं शीर्षक मी विसरभोळा खंडया (खंडाळे) असे ठेवणार होतो. मात्र एक दिवस त्याला याबद्दल चाचपून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला दमच दिला होता. त्यामुळे घाबरून मी असं शीर्षक दिलं. (एवढयावरून तुम्हाला शीर्षकामागची पार्श्वभूमी समजली असेलच.)
भाईविषयी किस्से सांगावे तेवढे कमी आहेत. तो दर दोन दिवसांनी आपला मोबाईल घरी विसरून येतो. (तो असं कसं विसरतो याचा मलाच प्रश्न पडतो.) कारण माणूस एकदा विसरेन दोनदा विसरेन पण हे आमचं पात्रं गेल्या दीड वर्षांत फक्त विसरतोयचं. आणि हे फक्त काही मोबाईल पुरतेच मर्यादित नाही तर ऑफिसमध्ये टिफिन विसरणे इतकचं काय चक्क डोळयावरचा चष्माही घरी विसरणं अशा गोष्टी त्याच्याकडून नित्यनेमाने होतात. पण आपण वारंवार एकच वस्तू विसरतो याचं त्याला काहीच वाटत नसतं. (त्याचंच आम्हाला वाईट वाटतं)
ऑफिसच्या एसीचा त्रास होणा-या लोकांच्या यादीत याचा वरचा क्रमांक लागतो. याला थंडी वाजायला लागली की, हा आपला ट्रॅकसूट काढतो आणि कामास सुरूवात करतो. त्याच्याकडे पाहून तो मैदानातून थेट ऑफिसमध्ये कामास आला आहे असं वाटते.(नवीन पाहणा-यास, आम्हाला नाही). भाई तसा खूप मृदू आहे.(मनमोहनसिंग एवढा नाही) त्यामुळे मला त्याच्याशी जास्त काळ अबोला ठेवता येत नाही. (म्हणजे मला ते जमतंच नाही).
भाईबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. त्याच्याबद्दल खूप लिहावं वाटतं. ते मी लिहिणारच आहे. पण ते आता नाही. त्यामुळे काही भाग राखून ठेवतो भविष्यात त्याच्या काही नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. एकमात्र आहे की चांगल्या आठवणी या आपल्या मेंदूरूपी मेमरीमधून कधीच पुसल्या जात नाहीत, असे म्हणतात. ते खरंच आहे. माझ्या औरंगाबादमधील ज्या काही निवडक आठवणी आहेत त्यापैकीच एक आमचं 'भाई' हे पात्र. आमच्या कायम लक्षात राहण्यासारखं !

खूप छान वाटले भाईबाबत हेवाचून खर म्हणजे मी सुद्धा भाई सोबत झी मध्ये काम केलं आहे त्यामुळे भाईच्या या सवयींचा मला माहिती आहे आणि त्याच्या सवयी कायम राखण्याच्या सवयीबाबत आदर सुद्धा आहे..खर म्हटलं तर भाईला आम्ही सुरुवातीला उन्मेषच म्हणाय़चे मात्र भाई ने भाई हा शब्द आमच्या तोंडी कसा टाकला ते आम्हालाही कळले नाही आणि हा भाई त्यानंतर संपूर्ण झी चा सुद्धा भाई झाला( त्यानंतर अरुण गवळीला कॉम्पलेक्स झाला होता असे कळले होते असो) तर भाईंचे भाई पुराण असेच सुरु राहवे हीच शुभेच्छा.. आणि दिग्विजय तु आता एक पाऊल पुढे जात फेसबुकवर भाई फँन्सच पेज सुरु कर त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल...
उत्तर द्याहटवाआपला विशाल करोळे भाईचा जुना आणि अजूनही असलेला चाहता...
या भाईला आम्हीपण लई दिवसापासनं वळखतो. भाई म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व. कवी मनाचा माणूस, कवीसुद्धा आहे. संवेदनशील, स्पष्टवक्ता, चौकस... वगैरे वगैरे. हा भाई अन आम्ही एकाच विद्यापीठात शिकलो. जरी आम्ही सिनियर होतो, तरी तो आम्हाला वर्गमित्रासारखाच होता. चळवळीचे बाळकडू घरातच मिळाल्याने पत्रकाराला आवश्यक असलेली सामाजिक जाण आणि भान भाईला आहे. भाईला त्या अर्थाने भाई (गुंड, दादा इ.) म्हणणे गुन्हा ठरेल. मला साम्यवादात अभिप्रेत असलेली साथी ही संकल्पना जवळची वाटते. उन्मेष हा त्याच दृष्टीने भाई (साथी) आहे.
उत्तर द्याहटवा* दिग्विजय आपणही असेच लिहित राहावे. आपणास चांगली शैली आहे. तेव्हा आपली लेखणी अशीच सुरू ठेवा.