टीम अण्‍णांचा राजकीय धोबीपछाड


मागील काही दिवसांपासून टीम अण्‍णा आणि संसद यांच्‍यातील वाद विकोपाला गेल्‍याचे दिसून येते. टीम अण्‍णातील प्रत्‍येक सदस्‍य खासदारांच्‍या विशेषाधिकारालाच आव्‍हान देत असून, त्‍यांच्‍याविरूद्ध ते दररोज काहीना काही तरी वादग्रस्‍त विधाने करीत आहेत. त्‍यामुळे संसदेतही टीम अण्णाविरूद्ध मोठया प्रमाणात गोंधळ होत असल्‍याचे दिसते. शरद यादव, लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यासारख्‍यांनी टीम अण्‍णांवर लोकसभेत मोठया प्रमाणावर टीका केली. म्‍हणजे ज्‍या पक्षांनी टीम अण्‍णांच्‍या लोकपालला संसदेत पाठिंबा दिला होता, तेही आज त्‍यांच्‍याविरोधात बोलताना दिसतात. कारण सरळ आहे, टीम अण्णाने त्‍यांच्‍या चारित्र्यावरच घाला घातला. त्‍यामुळे सा‍हजिकच ते विरोधात बोलणारच. पण टीमच्‍या सदस्‍यांनी हे जाणूनबुजून केलेले वक्‍तव्‍य आहे. त्‍यांना परिणामांची कल्‍पना असतानाही त्‍यांनी असे बोलण्‍याचे धाडस केले. म्‍हणजे त्‍यांनीच संसदेला पर्यायाने खासदारांना कोंडीत पकडण्‍याचे काम केले आहे. ते कसं?

मुंबईतील अयशस्‍वी उपोषणानंतर काही दिवस अज्ञातवासात गेलेल्‍या टीमअण्‍णा जंतर-मंतरवरील लाक्षणिक उपोषणास उतरताना पूर्ण तयारी करून उतरलेली दिसली. यापूर्वीची टीम अण्‍णांची विधाने पाहिल्‍यास आपल्‍या लक्षात येईल, प्रत्‍येकजण काहीतरी वेगळे मुद्दे मांडत किंवा वेगळयाच वादात अडकत असत. पण यावेळी बारकाईने पाहिल्‍यास हे लक्षात येईल की टीममधील प्रत्‍येक सदस्‍य संसद आणि त्‍यातील खासदारांबद्दलच बोलताना दिसतोय. टीम अण्‍णांच्‍या या भूमिकेचे कोणी समर्थन करेल किंवा त्‍यांना विरोधही करेल. ज्‍याचा त्‍याचा तो प्रश्‍न आहे. पण टीम अण्णा अचानक खासदारांवर किंवा संसदेवर का घसरली. यामागचं गिमिकंच वेगळं आहे.

देशातील राजकीय पक्ष टीम अण्‍णांच्‍याबाजूने लोकसमर्थन नसल्‍याचे कितीही म्‍हणत असले तरी वस्‍तुस्थिती पूर्णपणे तशी नाही. टीम अण्‍णांना जेवढे लोक आज विरोध करतात तेवढे समर्थन करणारेही आहेत. हे तमाम राजकीय पक्षांनाही माहीत आहे. लोकसभेत लोकपाल विधेयक संमत करताना पाठिंबा देण्‍याची भाषा करणा-या पक्षांनी ऐनवेळेस चर्चेचे गु-हाळ रंगवून मुळ मुद्यालाच बगल दिली. त्‍यामुळे पोळून घेतलेल्‍या टीमने यावेळी सत्ताधा-यांसह सर्वच खासदारांना खिंडीत गाठले. अण्‍णांनी व अरविंद केजरीवाल यांनी परिणामास तोंड देण्‍याची तयारी असल्‍याचे जाहीररित्‍या सांगण्‍यास सुरूवात केली.

संपूर्ण आठवडाभर टीम अण्‍णांच्‍या सदस्‍यांनी संसदेच्‍या विशेषाधिकाराचा अवमान केल्‍याप्रकरणी खासदारांनी गोंधळ घातला. संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. प्रत्‍येकांनी लंबेचौडे भाषणे केले. पण जेव्‍हा निर्णय घेण्‍याची वेळ आली तेव्‍हा टीम अण्‍णांना फक्‍त समज देऊन प्रकरण शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. टीम अण्‍णांना असे होणार हे माहीतच होते. कारण जर खासदारांनी टीमविरूद्ध एखादा निर्णय घेतला असता, तर संपूर्ण देशभरात संसदेबद्दल किंवा खासदारांबद्दल वेगळाच संदेश गेला असता आणि टीम अण्‍णांना हेच पाहिजे होते. असा निर्णय झाला असता, तर टीमची सहानुभूती आणखी वाढली असती, सत्ताधा-यांविरोधात जनमत तयार झाले असते. पण संसद सदस्‍यही ति‍तकेच हुशार निघाले त्‍यांनीही कठोर निर्णय न घेता फक्‍त समजुतीवरच भागवले. म्‍हणजे यावेळीही राजकारणाने टीम अण्‍णांना कुरघोडी करण्‍याची संधी दिली नाही.

एकंदर या सर्व घडामोडींकडे पाहिल्‍यास हे लक्षात येईल की टीम अण्‍णाही हळूहळू राजकारण्‍यांबरोबर राजकीय खेळी करण्‍यात तरबेज होत आहे. याचा अर्थ टीम अण्‍णाही राजकीय डावपेचात तरबेज होताना दिसते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'